माझा मित्र सचिन दोन दिवस पुण्यात येणार होता. शनिवार - रविवारी एक किल्ला नक्की करू असे आम्ही पक्के ठरवून टाकले. सकाळी सातला आम्ही (मी-मेघा-प्रणव आणि सचिन-भाग्यश्री-श्लोक) निघालो. ताम्हिणी घाट उतरला की डावीकडे माणगाव रस्त्यावर कांदळगावला जिते गावाकडे जाणारा फाटा आहे. जिते हे कुर्डुगडाच्या पायथ्याचे गाव. सकाळी पुण्यातून निघून १० वाजेपर्यंत जिते गावात पोचलो. किल्ल्याची थोडी माहिती घेतली होती.
गावकऱ्यांनी कसे जायचे ते समजावून सांगितले. गावातून किल्ला दिसत नाही. मध्ये दोन मोठी टेकाडे आहेत. अलिकडचे वाळलेल्या गवतामुळे पिवळे दिसत होते. त्याला डावीकडे ठेवून थोडा वळसा घातला की मागचे काळपट तपकिरी टेकाड दिसायला लागले. डावीकडे वळून त्या टेकाडावर चढायला सुरुवात केली. वरती आलो तर समोरचे दृश्य अप्रतिम असेच होते. दोन टेकड्यांमधली दरी खोल आणि थरारक अशीच आहे. आता किल्ल्याचा सुळका आणि मागे त्याच्यापेक्षा भव्य अशी सह्याद्रीची मुख्य रांग झकास दिसत होती.
आता वाट सपाटीने होती. थोड्याच वेळात आम्ही कुर्डुपेठ गावात पोचलो. गाव अगदीच छोटे. जेमतेम पाच-दहा घरे. गावापुढे दोन मिनीटांच्या अंतरावर कुर्डाई देवीचे मंदिर आहे. मंदिर अगदी छोटे. मंदिरातच शाळाही भरते. अकरा विद्यार्थ्यांची नावे फळ्यावर लिहिलेली दिसली.
आम्ही लगेच किल्ल्याकडे निघालो. पंधरा मिनिटात सुळक्याच्या कातळाला भिडलो. सुरुवातीला एक स्वच्छ पाण्याचे टाके लागले. पाण्यावर निवळ्या फिरत होत्या त्यामुळे पाणी प्यायला हरकत नाही याची खात्री पटली. यथेच्छ पाणी पिऊन आणि बाटल्या भरून पुढे निघालो. उजवीकडे गुहा आहे पण वाट तुटलेली वाटली. मग डावीकडून प्रदक्षिणा सुरू केली. आधी एक घळ व नंतर एक बुरुज लागला. बुरुजासमोर थोडा चढ चढून गेल्यावर "कोकण खिडकी" नावाचे एक नैसर्गिक आश्चर्य दिसते. अंदाजे वीस फूट उंचीच्या दोन पाषाणांवर तेवढाच एक खडक वरून तुटून पडून तोलला गेला आहे. आणि एक खिडकी तयार झाली आहे. खिडकीतून सुंदर नजारा दिसत होता.
आता परत फिरून टाक्यापाशी पोटपूजा उरकली. भरपूर तंगडतोड झाल्यामुळे भूकही सणकून लागली होती. मस्त मोकळे वातावरण, खायला पराठे आणि शुद्ध पाणी ....अजून काय हवं. मंदिरापाशी परत आलो. चार वाजले होते. पटपट खाली उतरून घरी जाऊ शकू एवढा वेळ होता खरंतर. पण विचार केला की अनेक वर्षात गडावर मंदिरात मुक्काम केला नाहीये, आज करून पाहू.
गावात जेवणाची सोय होईल का ते विचारले तर नकारघंटा मिळाली. थोडी फळं होती, तेवढ्यावर निभावेल असं वाटलं. शेकोटी करण्यासाठी लाकूडफाटा जमा करून ठेवला. तेवढ्यात एक सांबरे नावाच्या आजी मदतीला आल्या. त्यांनी डाळभात आणून देते असे सांगितल्यावर जीवात जीव आला. आता सूर्य मावळून अंधाराचं साम्राज्य पसरायला सुरूवात झाली होती. बराच प्रयत्न केल्यावर शेकोटी पेटली एकदाची. कृष्ण अष्टमी असल्याने चंद्रोदय रात्री एकच्या सुमारास होणार होता. शहरात आपल्याला दिव्यांची इतकी सवय झालेली असते की अशा ठिकाणी अंधाराचं अस्तित्व अधिक प्रकर्षाने जाणवतं. थोड्याच वेळात आजीबाई डाळभात, दोन ब्लॅंकेट आणि एक टॉर्च घेऊन आल्या. भुकेल्या पोटी ही वन डीश मील अमाप तृप्ति देऊन गेली.
आता मात्र नऊ वाजून गेल्याने सर्वत्र अंधार गुडुप झालं होतं. अशा काळोखात अंधारालाही वाचा फुटते. लांबून अस्पष्ट असे गायींचे हंबरणे किंवा कुत्र्यांचा भुत्कार एकीकडे आधारही देत होता तर एखादं जनावर तर येणार नाही ना अशी अनामिक भीती पण घालत होता. आता निवांतपणे झोपण्याचा विचार केला. टाॅर्चच्या प्रकाशाचाच एक आधार होता. मंदिरात नाकतोडे, मुंगळे, पाली व इतर अनेक किडे संचार करत होते. आम्ही त्यांच्या राज्यात घुसखोरी केली होती ना. मला अशावेळी कधीच नीट झोप लागत नाही. एक दोन डुलक्या सोडल्या तर बहुतांश रात्र मी जागूनच काढली.
सकाळी आजीबाई चहा घेऊन आल्या. त्यांना पैसे देऊ केले तर घेईनात. नातवंडांच्या शिक्षणासाठी ठेवा म्हटल्यावर त्यांनी घेतले. सर्व सामान आवरून आम्ही उतरायला सुरुवात केली. दोन टेकड्यांमधे छान धुक्याची दुलई पसरली होती. त्यातून चालण्याचा अनुभव अगदी अवर्णनीय होता. गवताच्या पात्यांवर दवबिंदूंची पखरण होती. त्यातून चालताना तो ओला स्पर्श सुखावून जात होता. चटाचट उतरत जिते गावात आलो. आमची स्विफ्ट कार वाटच पाहत होती. अशा तर्हेने एका संस्मरणीय ट्रेकची सांगता झाली.