दोन दिवसात कुठे जायचं यावर आम्हा मित्रांचा भरपूर खल चालला होता. मार्चचा दुसरा आठवडा होता, ऊन तापायला लागलं होतं मात्र अजून असह्य झालं नव्हतं. नंतर मुलांच्या परिक्षा सुरू होणार, त्याच्या आत एक ट्रेक करायचा होता. आधी हेळवाकजवळचा भैरवगड ठरवला. पण तिथल्या वनखात्याच्या कार्यालयात संपर्क केला असता तेथे जाण्याची परवानगी आहे मात्र मुक्कामाची नाही असे कळाले. एका दिवसात चालत हा २४ किमीचा ट्रेक करणे अवघड आहे. मग चकदेव हा सुटसुटीत पर्याय पुढे आला.
बरेच जण दोन दिवसांत चकदेवसह महिमंडणगड व पर्वत असा जंबो ट्रेक करतात. आम्ही मात्र एवढी तंगडतोड करण्यापेक्षा एकच करायचा असं ठरवलं. भरपूर गप्पा व्हाव्यात आणि निवांत वेळ मिळावा हाच मुख्य उद्देश. चकदेव हा काही किल्ला नाही, ते प्रसिद्ध आहे ते पठारावरील चौकेश्वराच्या मंदिरासाठी व पठारावरून कोकणात उतरणार्या वाटेवरील थरारक शिड्यांसाठी. चकदेवला जाण्यासाठी आधी खेड गाठावं लागतं. खेडहून खोपी, रघुवीर घाटमार्गे मेट शिंदी हे पायथ्याचे गाव आहे ३० किलोमीटरवर. यात शेवटचा चार किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे पण आमच्या मारुती स्विफ्टला काही अडचण आली नाही. खेडहून शिंदीला दुपारी ४ वाजता मुक्कामी एस्टी पण आहे. ज्यांना दुसर्या दिवशी शिड्यांवरून कोकणात उतरायचे आहे त्यांना ती सोयीची पडते.
आम्ही दुपारी साडेचारच्या सुमारास शिंदीत पोचलो. तिथे चौकातच चौकेश्वराकडे जाणाऱ्या पायवाटेचा दिशादर्शक फलक लावला आहे. पहिला अर्धा तास चांगलीच तीव्र चढण आहे. दोनतीन वेळा विश्रांती घेत एका कड्याच्या सावलीत विसावलो. इथून शिंदी गाव, महिमंडणगड, पर्वत, आरावपर्यंत आलेले कोयना जलाशयाचे (शिवसागर) पाणी असा नेत्रसुखद नजारा दिसत होता. ज्यांच्याकडे आमची जेवणाची व मुक्कामाची सोय होती ते संतोष जंगम (९४२२३९३०२२) तिथेच भेटले. मग तेथून संतोषबरोबरच चकदेवकडे निघालो. गप्पा मारताना अनेक विषयांना स्पर्ष होत होता. केवळ पावसाळ्यात होणारी भातशेती, दुधदुभते, मधोत्पादन यावर येथील अर्थकारण अवलंबून आहे.
वाटेत धायटीची झुडुपे व पांगाऱ्याची झाडे केशरी - लालसर फुलांनी फुलली होती. चकदेव गावात पोचलो तेव्हा सूर्यबिंब पश्चिम क्षितिजाला टेकले होतं. अस्ताचलाला जाणाऱ्या त्या तेजोनिधीस कॅमेरात बंद करण्याचा प्रयत्न करून पाहिला. सूर्यास्ताचे विहंगम दृश्य आणि क्षितिजावर होणारी रंगाची उधळण दर वेळी नवीच भासते. चौकेश्वराच्या मंदिरामागे तो केशरी गोळा दिसेनासा झाल्यावर पावले संतोषच्या घराकडे वळली.
चकदेव गावात वीज पोचली आहे. मोबाईल चार्जिंगला लावले. फक्कड चहाने संतोषच्या घरात आमचे स्वागत झाले. वेळ हाती होता म्हणून चौकेश्वराच्या दर्शनाला निघालो. जुन्या दगडी मंदिराचे विस्तारीकरण गावकऱ्यांनी केले आहे. मंदिरात शिवलिंग व रामपंचायतनाच्या सुंदर पितळी मूर्ती आहेत.
आता रात्रीच्या जेवणाचे वेध लागले होते. तांदळाच्या भाकर्या, मिश्र कडधान्यांची उसळ, भात-आमटी व कुरडया असा फर्मास बेत होता. तृप्तीची ढेकर दिल्यावर शतपावलीस बाहेर पडलो. प्रदूषणविरहीत आकाशात तार्यांचा खच पडला होता. हाताने तोडून घेता येतील इतकी ती नक्षत्रे नजीक वाटत होती. संतोषचे घर प्रशस्त आहे. सारवलेले अंगण पथाऱ्या पसरायला साजेसेच आहे. स्वच्छतागृहाची सोय आहे.
पहाटेच उठलो आणि चहा घेऊन सरळ पश्चिमेकडे निघालो. अजून सूर्योदय व्हायचा होता. अर्ध्या तासात एका निमुळत्या सोंडेवर येऊन पोचलो. इथे कडा उतरण्यासाठी एकापाठोपाठ एक अशा तीन शिड्या आहेत. पूर्वीच्या लाकडाच्या शिड्यांची जागा आता लोखंडी शिड्यांनी घेतली आहे. आम्हाला कोकणात उतरायचे नव्हते म्हणून आम्ही फक्त शिड्या उतरून परत वर आलो. इथे कड्यात एक शेंदूर फासलेला गणपती आहे, जो कोकणातून येणाऱ्यांना दीपस्तंभासारखा वाटत असतो. इथून रसाळ-सुमार-महिपत ही दुर्गत्रयी दिसली तसेच उत्तरेकडे खोगीराच्या आकाराचा मधुमकरंदगड लक्ष वेधून घेतो. परत गावात आलो. चहा पोह्यांचा नाश्ता केला. संतोषला प्रतिमाणशी ४००रूपये दिले. झटपट आवरून वलवणच्या दिशेने गावाबाहेर पडलो. वलवण ते शिंदी कच्चा रस्ता आहे. गावात थंडगार "माझा" पिऊन शीण घालवला. चकदेवच्या कड्याचा निरोप घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो.