Tuesday, 20 February 2018

हरिहर किल्ला (Harihar/Harshgad)


           'चला जाता हूँ किसी की धून में
         धडकते दिल के तराने लिए'
कारमधल्या म्युझिक सिस्टमवर या गाण्याचा आस्वाद घेत आम्ही नाशिकहून त्र्यंबकेश्वर रस्त्याने हरिहर किल्ल्याकडे निघालो होतो. आणि "धडकता दिल" किती जोरात धडकू शकतो याचा अनुभव आम्हाला आता काही वेळातच येणार होता. हरिहर हा त्र्यंबक रांगेतील किल्ला. निसर्गाची रचना आणि मानवाची दुर्गमाला सुगम करण्याची धडपड याचे सुरेख मिश्रण या किल्ल्यात आढळते.
        नाशिक - खोडाळा रस्त्यावरील निरगुडपाडा हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव. गावातून किल्ल्याचा पहाड आकाशात घुसलेला दिसतो. किल्ल्यापासून डावीकडे एक सोंड उतरलेली दिसते. या सोंडेची दिशा धरून चालायला सुरुवात केली. आधी शेताडी पार करून मग चढ सुरू झाला. हाश्शहुश्श करत तासाभरात सोंडेच्या माथ्यावर पोचलो. इथून ढगांशी गप्पा मारणारा किल्ल्याचा कातळ भेदक दिसत होता. कातळात खोदलेली तिरकी रेघ उत्सुकता वाढवत होती. जसजसे किल्ल्याच्या जवळ जाऊ लागलो तसतशी ही रेघ स्पष्ट होऊ लागली. ही रेघ म्हणजे दुसरेतिसरे काही नसून सुमारे १५० पायर्‍यांचा अखंड जिनाच आहे.
         या पायर्‍या हेच किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. १८१८ साली ब्रिटिशांनी जेव्हा महाराष्ट्रातील सर्व किल्ले जिंकले तेव्हा बहुतांश किल्ल्यांवरील पायर्‍या तोडून हे किल्ले पुन्हा वापरण्यास निकामी करून टाकले. मात्र हा किल्ला जिंकणारा कॅ. ब्रिग्ज या पायर्‍या पाहून इतका विस्मयचकित झाला की त्याने त्यांचे नुकसान केले नाही. छिन्नी - पहार - हातोड्याशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसताना काहीशे वर्षांपूर्वी या पायर्‍या कश्या खोदल्या असतील या विचाराने आपण आजही अचंबित होतो.
       सुरुवातीला सुमारे ६० अंश कोनात असणारा हा जिना, जसेजसे आपण वर जाऊ तसेतसे त्याचे खरे रूप दाखवण्यासाठी आपला कोन वाढवत नेतो. आणि 'धडकत्या दिलाची' नव्याने अनुभूती घेत आम्ही पहिल्या दरवाज्यात पोचलो. इथून पुढे सरळ वर चढण्यासाठी जागा नसल्याने कातळ खोदून आडवी वाट तयार केली आहे. या वाटेने जाताना डावीकडे दरीत पाहिल्यावर डोळेच फिरतात. इथून पुढे परत एक नागमोडी वळणांचा जिना माणसाच्या थिटेपणाची व निसर्गाच्या रौद्रतेची जाणीव करून देतो. या जिन्याच्या आधी दुसरा आणि नंतर तिसरा दरवाजा लागतो. द्विपादाचे चतुष्पाद होत आपण या दरवाज्यात पोचतो. इथे पुन्हा कॅ. ब्रिग्जच्या 'केवळ पाच सैनिक हा किल्ला कितीही प्रबळ शत्रूविरूध्द झुंजवत ठेवू शकतात' या उद्गारांची आठवण झाली. किल्ल्यावर येण्याचा हा एकमेव मार्ग आहे कारण इतर सर्व बाजूंनी तुटलेले कातळकडे आहेत.
     किल्ल्याच्या माथ्यावर पोचल्यावर प्रथम समोर एक मोठा तलाव दिसतो. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. इथे काठावर एक शिवपिंडी आणि मारुतीची मूर्ती आहे. समोर लांबवर एक बांधीव वास्तू दिसत असते. तिथे गेल्यावर समजते की ते एक कोठार आहे. इथेही काही पाण्याची टाकी आहेत. हे पाहून तलावापाशी परतले की हरिहरच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. इथून लांबवरचे दृश्य न्याहाळत बसले की वेळ कसा जातो तेच कळत नाही. इतक्या उंचीवरून शेते, कुरणे, छोट्या - मोठ्या वाड्या पाहताना काहीतरी जिंकल्याचे समाधान मिळत असते. रोजच्या जीवनातील घड्याळाच्या काट्यावर चालणारी धावपळ मागे पडलेली असते. किल्ला चढताना घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याची भावना दाटून येते. मोकळे आकाश, भन्नाट वारा आणि एकांत यांची मैफल जमून येते. ही मैफल किती वेळ रंगेल ते सांगता येत नाही.
      उन्हं कलायला लागल्यावर आपल्याला आता जिना सुरक्षितपणे उतरायचाही आहे या विचाराने वास्तवात परतलो. प्रत्येक पाऊल सावधपणे खाली घेत, खोदीव खोबण्यांचा आधार घेत खाली आलो. खाली गावात पार्क केलेली कार ठिपक्याएवढी दिसत होती, तिचा रोख धरून किल्ल्याचा निरोप घेतला.