Saturday 4 April 2020

भैरवगड(हेळवाक/पाथरपुंज ), Bhairavgad(Helwak/Patharpunj )





      मागच्या वेळेला चकदेवला जाऊन आल्यावर कोयनेच्या अभयारण्यातील भैरवगडाला जायचे नक्की केले होते. तेथे जाण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते, हे माहीत असल्याने आधी त्याची माहिती गोळा करायला सुरुवात केली. नशिबाने एका मित्रामार्फत शिवाभाऊ या जीपवाल्याचा मोबाईल नंबर मिळाला. ही परवानगी वनखात्याच्या कोळणे येथील तपासणी कार्यालयात जीपच्या प्रवासादरम्यान घेतली तरी चालते असे कळाले. आधी संपर्क केला नाही तरी बिघडत नाही. फक्त सोमवारी आत सोडत नाहीत.
      पाटण व कोयनानगर मधील धक्का या नाक्यावर सकाळी आठ वाजता आम्ही आमची कार पार्क केली व शिवाभाऊंच्या कमांडर जीप मध्ये स्थानापन्न झालो. कोयनेचे पाणी अतिशय स्वच्छ दिसत होते. पूल ओलांडून आम्ही काडोलीकडे निघालो. इथून पुढे मात्र अतिशय खराब रस्ता होता. आधी नाव मग कोळणे गाव लागले. तिथे प्रतिमाणशी 30 रुपये व गाडीचे दीडशे रुपये असे वनखात्याचे शुल्क भरले. पुढे पाथरपुंज गाव लागले की जे या रस्त्यावरचे शेवटचे गाव आहे. तिथे जेवणाची वर्दी देऊन ठेवली.
    पुढे भैरव मंदिरापर्यंत चार किमी घनदाट जंगलातून रस्ता आहे. रस्ता अतिशय खडबडीत, पूर्णपणे दगडधोंड्यातून जाणारा आहे. किर्र झाडी व अस्पर्शित निसर्गाचा आनंद घेत आम्ही भैरव मंदिरापाशी पोहोचलो. मंदिर डोंगराच्या अगदी कडेला आहे. तेथून भैरवगड व मधील खिंड स्पष्ट दिसते. दर्शन घेऊन आम्ही भैरवगडाकडे निघालो. खिंडीत उतरुन भैरवगडाचा कडा उजवीकडे ठेवून गडाला डाव्या बाजूने वळसा मारावा लागतो. दोन छोटे बुरुज पार केल्यानंतर वाट एका घळीतून वर चढते. इथेच एका दरवाजाचे अवशेष आहेत. इथेच थोडे पुढे एक पाण्याचे टाके आहे. पाणी चांगले आहे. टाक्याच्या शेजारून वर चढल्यावर पूर्वेकडे भैरव मंदिराच्या दिशेने चालत राहायचे. वाटेत एका वाड्याचे अवशेष दिसले. कड्यापाशी आल्यावर  भैरव मंदिराचे सुरेख दर्शन होते. ते पाहून आम्ही मागे फिरलो. आल्या वाटेने परत भैरव मंदिरात आलो. येथे कोकणातून सुद्धा येता येते. डेरवणच्या शिवसृष्टीहून पुढे येणारा रस्ता पाथे या गावी येतो व तेथून भैरव मंदिरापर्यंत चांगली वाट आहे. अशा घनदाट जागी माणसांचा थोडातरी वावर राहावा या हेतूनेच कदाचित अशा ठिकाणी मंदिरांची रचना केली असावी.
    पाथरपुंज गावात गावरान जेवणाचा आस्वाद घेतला.परत धक्का स्टॉप ला आल्यानंतर कोयनेच्या नितळ पाण्यात अंग झोकून दिले. थंडगार पाण्याने मन उल्हासित झाले. असा हा आडवळणी ट्रेक पूर्ण करून आम्ही घरी परतलो.

Saturday 17 March 2018

चकदेव (Chakdeo)

   दोन दिवसात कुठे जायचं यावर आम्हा मित्रांचा भरपूर खल चालला होता. मार्चचा दुसरा आठवडा होता, ऊन तापायला लागलं होतं मात्र अजून असह्य झालं नव्हतं. नंतर मुलांच्या परिक्षा सुरू होणार, त्याच्या आत एक ट्रेक करायचा होता. आधी हेळवाकजवळचा भैरवगड ठरवला. पण तिथल्या वनखात्याच्या कार्यालयात संपर्क केला असता तेथे जाण्याची परवानगी आहे मात्र मुक्कामाची नाही असे कळाले. एका दिवसात चालत हा २४ किमीचा ट्रेक करणे अवघड आहे. मग चकदेव हा सुटसुटीत पर्याय पुढे आला.
     बरेच जण दोन दिवसांत चकदेवसह महिमंडणगड व पर्वत असा जंबो ट्रेक करतात. आम्ही मात्र एवढी तंगडतोड करण्यापेक्षा एकच करायचा असं ठरवलं. भरपूर गप्पा व्हाव्यात आणि निवांत वेळ मिळावा हाच मुख्य उद्देश. चकदेव हा काही किल्ला नाही, ते प्रसिद्ध आहे ते पठारावरील चौकेश्वराच्या मंदिरासाठी व पठारावरून कोकणात उतरणार्‍या वाटेवरील थरारक शिड्यांसाठी.  चकदेवला जाण्यासाठी आधी खेड गाठावं लागतं. खेडहून खोपी, रघुवीर घाटमार्गे मेट शिंदी हे पायथ्याचे गाव आहे ३० किलोमीटरवर. यात शेवटचा चार किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे पण आमच्या मारुती स्विफ्टला काही अडचण आली नाही. खेडहून शिंदीला दुपारी ४ वाजता मुक्कामी एस्टी पण आहे. ज्यांना दुसर्‍या दिवशी शिड्यांवरून कोकणात  उतरायचे आहे त्यांना ती सोयीची पडते.
          आम्ही दुपारी साडेचारच्या सुमारास शिंदीत पोचलो. तिथे चौकातच चौकेश्वराकडे जाणाऱ्या पायवाटेचा दिशादर्शक फलक लावला आहे. पहिला अर्धा तास चांगलीच तीव्र चढण आहे. दोनतीन वेळा विश्रांती घेत एका कड्याच्या सावलीत विसावलो. इथून शिंदी गाव, महिमंडणगड, पर्वत, आरावपर्यंत आलेले कोयना जलाशयाचे (शिवसागर) पाणी असा नेत्रसुखद नजारा दिसत होता.  ज्यांच्याकडे आमची जेवणाची व मुक्कामाची सोय होती ते संतोष जंगम (९४२२३९३०२२) तिथेच भेटले. मग तेथून संतोषबरोबरच चकदेवकडे निघालो. गप्पा मारताना अनेक विषयांना स्पर्ष होत होता. केवळ पावसाळ्यात होणारी भातशेती, दुधदुभते, मधोत्पादन यावर येथील अर्थकारण अवलंबून आहे.
       वाटेत धायटीची झुडुपे व पांगाऱ्याची झाडे केशरी - लालसर फुलांनी फुलली होती. चकदेव गावात पोचलो तेव्हा  सूर्यबिंब पश्चिम क्षितिजाला टेकले होतं. अस्ताचलाला जाणाऱ्या त्या तेजोनिधीस कॅमेरात बंद करण्याचा प्रयत्न करून पाहिला. सूर्यास्ताचे विहंगम दृश्य आणि क्षितिजावर होणारी रंगाची उधळण दर वेळी नवीच भासते. चौकेश्वराच्या मंदिरामागे तो केशरी गोळा दिसेनासा झाल्यावर पावले संतोषच्या घराकडे वळली.
     चकदेव गावात वीज पोचली आहे. मोबाईल चार्जिंगला लावले. फक्कड चहाने संतोषच्या घरात आमचे स्वागत झाले. वेळ हाती होता म्हणून चौकेश्वराच्या दर्शनाला निघालो. जुन्या दगडी मंदिराचे विस्तारीकरण गावकऱ्यांनी केले आहे. मंदिरात शिवलिंग व रामपंचायतनाच्या सुंदर पितळी मूर्ती आहेत.
     आता रात्रीच्या जेवणाचे वेध लागले होते. तांदळाच्या भाकर्‍या, मिश्र कडधान्यांची उसळ, भात-आमटी व कुरडया असा फर्मास बेत होता. तृप्तीची ढेकर दिल्यावर शतपावलीस बाहेर पडलो. प्रदूषणविरहीत आकाशात तार्‍यांचा खच पडला होता. हाताने तोडून घेता येतील इतकी ती नक्षत्रे नजीक वाटत होती. संतोषचे घर प्रशस्त आहे. सारवलेले अंगण पथाऱ्या पसरायला साजेसेच आहे. स्वच्छतागृहाची सोय आहे.
      पहाटेच उठलो आणि चहा घेऊन सरळ पश्चिमेकडे निघालो. अजून सूर्योदय व्हायचा होता. अर्ध्या तासात एका निमुळत्या सोंडेवर येऊन पोचलो. इथे कडा उतरण्यासाठी एकापाठोपाठ एक अशा तीन शिड्या आहेत. पूर्वीच्या लाकडाच्या शिड्यांची जागा आता लोखंडी शिड्यांनी घेतली आहे. आम्हाला कोकणात उतरायचे नव्हते म्हणून आम्ही फक्त शिड्या उतरून परत वर आलो. इथे कड्यात एक शेंदूर फासलेला गणपती आहे, जो कोकणातून येणाऱ्यांना दीपस्तंभासारखा वाटत असतो. इथून रसाळ-सुमार-महिपत ही दुर्गत्रयी दिसली तसेच उत्तरेकडे खोगीराच्या आकाराचा मधुमकरंदगड लक्ष वेधून घेतो. परत गावात आलो. चहा पोह्यांचा नाश्ता केला. संतोषला प्रतिमाणशी ४००रूपये दिले.  झटपट आवरून वलवणच्या दिशेने गावाबाहेर पडलो. वलवण ते शिंदी कच्चा रस्ता आहे. गावात थंडगार "माझा" पिऊन शीण घालवला. चकदेवच्या कड्याचा  निरोप घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो.

Tuesday 20 February 2018

हरिहर किल्ला (Harihar/Harshgad)


           'चला जाता हूँ किसी की धून में
         धडकते दिल के तराने लिए'
कारमधल्या म्युझिक सिस्टमवर या गाण्याचा आस्वाद घेत आम्ही नाशिकहून त्र्यंबकेश्वर रस्त्याने हरिहर किल्ल्याकडे निघालो होतो. आणि "धडकता दिल" किती जोरात धडकू शकतो याचा अनुभव आम्हाला आता काही वेळातच येणार होता. हरिहर हा त्र्यंबक रांगेतील किल्ला. निसर्गाची रचना आणि मानवाची दुर्गमाला सुगम करण्याची धडपड याचे सुरेख मिश्रण या किल्ल्यात आढळते.
        नाशिक - खोडाळा रस्त्यावरील निरगुडपाडा हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव. गावातून किल्ल्याचा पहाड आकाशात घुसलेला दिसतो. किल्ल्यापासून डावीकडे एक सोंड उतरलेली दिसते. या सोंडेची दिशा धरून चालायला सुरुवात केली. आधी शेताडी पार करून मग चढ सुरू झाला. हाश्शहुश्श करत तासाभरात सोंडेच्या माथ्यावर पोचलो. इथून ढगांशी गप्पा मारणारा किल्ल्याचा कातळ भेदक दिसत होता. कातळात खोदलेली तिरकी रेघ उत्सुकता वाढवत होती. जसजसे किल्ल्याच्या जवळ जाऊ लागलो तसतशी ही रेघ स्पष्ट होऊ लागली. ही रेघ म्हणजे दुसरेतिसरे काही नसून सुमारे १५० पायर्‍यांचा अखंड जिनाच आहे.
         या पायर्‍या हेच किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. १८१८ साली ब्रिटिशांनी जेव्हा महाराष्ट्रातील सर्व किल्ले जिंकले तेव्हा बहुतांश किल्ल्यांवरील पायर्‍या तोडून हे किल्ले पुन्हा वापरण्यास निकामी करून टाकले. मात्र हा किल्ला जिंकणारा कॅ. ब्रिग्ज या पायर्‍या पाहून इतका विस्मयचकित झाला की त्याने त्यांचे नुकसान केले नाही. छिन्नी - पहार - हातोड्याशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसताना काहीशे वर्षांपूर्वी या पायर्‍या कश्या खोदल्या असतील या विचाराने आपण आजही अचंबित होतो.
       सुरुवातीला सुमारे ६० अंश कोनात असणारा हा जिना, जसेजसे आपण वर जाऊ तसेतसे त्याचे खरे रूप दाखवण्यासाठी आपला कोन वाढवत नेतो. आणि 'धडकत्या दिलाची' नव्याने अनुभूती घेत आम्ही पहिल्या दरवाज्यात पोचलो. इथून पुढे सरळ वर चढण्यासाठी जागा नसल्याने कातळ खोदून आडवी वाट तयार केली आहे. या वाटेने जाताना डावीकडे दरीत पाहिल्यावर डोळेच फिरतात. इथून पुढे परत एक नागमोडी वळणांचा जिना माणसाच्या थिटेपणाची व निसर्गाच्या रौद्रतेची जाणीव करून देतो. या जिन्याच्या आधी दुसरा आणि नंतर तिसरा दरवाजा लागतो. द्विपादाचे चतुष्पाद होत आपण या दरवाज्यात पोचतो. इथे पुन्हा कॅ. ब्रिग्जच्या 'केवळ पाच सैनिक हा किल्ला कितीही प्रबळ शत्रूविरूध्द झुंजवत ठेवू शकतात' या उद्गारांची आठवण झाली. किल्ल्यावर येण्याचा हा एकमेव मार्ग आहे कारण इतर सर्व बाजूंनी तुटलेले कातळकडे आहेत.
     किल्ल्याच्या माथ्यावर पोचल्यावर प्रथम समोर एक मोठा तलाव दिसतो. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. इथे काठावर एक शिवपिंडी आणि मारुतीची मूर्ती आहे. समोर लांबवर एक बांधीव वास्तू दिसत असते. तिथे गेल्यावर समजते की ते एक कोठार आहे. इथेही काही पाण्याची टाकी आहेत. हे पाहून तलावापाशी परतले की हरिहरच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. इथून लांबवरचे दृश्य न्याहाळत बसले की वेळ कसा जातो तेच कळत नाही. इतक्या उंचीवरून शेते, कुरणे, छोट्या - मोठ्या वाड्या पाहताना काहीतरी जिंकल्याचे समाधान मिळत असते. रोजच्या जीवनातील घड्याळाच्या काट्यावर चालणारी धावपळ मागे पडलेली असते. किल्ला चढताना घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याची भावना दाटून येते. मोकळे आकाश, भन्नाट वारा आणि एकांत यांची मैफल जमून येते. ही मैफल किती वेळ रंगेल ते सांगता येत नाही.
      उन्हं कलायला लागल्यावर आपल्याला आता जिना सुरक्षितपणे उतरायचाही आहे या विचाराने वास्तवात परतलो. प्रत्येक पाऊल सावधपणे खाली घेत, खोदीव खोबण्यांचा आधार घेत खाली आलो. खाली गावात पार्क केलेली कार ठिपक्याएवढी दिसत होती, तिचा रोख धरून किल्ल्याचा निरोप घेतला. 

Friday 15 December 2017

कुर्डुगड / विश्रामगड (Kurdugad)

           माझा मित्र सचिन दोन दिवस पुण्यात येणार होता. शनिवार - रविवारी एक किल्ला नक्की करू असे आम्ही पक्के ठरवून टाकले. सकाळी सातला आम्ही (मी-मेघा-प्रणव आणि सचिन-भाग्यश्री-श्लोक) निघालो. ताम्हिणी घाट उतरला की डावीकडे माणगाव रस्त्यावर कांदळगावला जिते गावाकडे जाणारा फाटा आहे. जिते हे कुर्डुगडाच्या पायथ्याचे गाव. सकाळी पुण्यातून निघून १० वाजेपर्यंत जिते गावात पोचलो.               किल्ल्याची थोडी माहिती घेतली होती.
गावकऱ्यांनी कसे जायचे ते समजावून सांगितले. गावातून किल्ला दिसत नाही. मध्ये दोन मोठी टेकाडे आहेत. अलिकडचे वाळलेल्या गवतामुळे पिवळे दिसत होते. त्याला डावीकडे ठेवून थोडा वळसा घातला की मागचे काळपट तपकिरी टेकाड दिसायला लागले. डावीकडे वळून त्या टेकाडावर चढायला सुरुवात केली. वरती आलो तर समोरचे दृश्य अप्रतिम असेच होते. दोन टेकड्यांमधली दरी खोल आणि थरारक अशीच आहे. आता किल्ल्याचा सुळका आणि मागे त्याच्यापेक्षा भव्य अशी सह्याद्रीची मुख्य रांग झकास दिसत होती.
           आता वाट सपाटीने होती. थोड्याच वेळात आम्ही कुर्डुपेठ गावात पोचलो. गाव अगदीच छोटे. जेमतेम पाच-दहा घरे. गावापुढे दोन मिनीटांच्या अंतरावर कुर्डाई देवीचे मंदिर आहे. मंदिर अगदी छोटे. मंदिरातच शाळाही भरते. अकरा विद्यार्थ्यांची नावे फळ्यावर लिहिलेली दिसली.
आम्ही लगेच किल्ल्याकडे निघालो. पंधरा मिनिटात सुळक्याच्या कातळाला भिडलो. सुरुवातीला एक स्वच्छ पाण्याचे टाके लागले. पाण्यावर निवळ्या फिरत होत्या त्यामुळे पाणी प्यायला हरकत नाही याची खात्री पटली. यथेच्छ पाणी पिऊन आणि बाटल्या भरून पुढे निघालो. उजवीकडे गुहा आहे पण वाट तुटलेली वाटली. मग डावीकडून प्रदक्षिणा सुरू केली. आधी एक घळ व नंतर एक बुरुज लागला. बुरुजासमोर थोडा चढ चढून गेल्यावर "कोकण खिडकी" नावाचे एक नैसर्गिक आश्चर्य दिसते. अंदाजे वीस फूट उंचीच्या दोन पाषाणांवर तेवढाच एक खडक वरून तुटून पडून तोलला गेला आहे. आणि एक खिडकी तयार झाली आहे. खिडकीतून सुंदर नजारा दिसत होता.
          आता परत फिरून टाक्यापाशी पोटपूजा उरकली. भरपूर तंगडतोड झाल्यामुळे भूकही सणकून लागली होती. मस्त मोकळे  वातावरण, खायला पराठे आणि शुद्ध पाणी ....अजून काय हवं. मंदिरापाशी परत आलो. चार वाजले होते. पटपट खाली उतरून घरी जाऊ शकू एवढा वेळ होता खरंतर. पण विचार केला की अनेक वर्षात गडावर मंदिरात मुक्काम केला नाहीये, आज करून पाहू.
           गावात जेवणाची सोय होईल का ते विचारले तर नकारघंटा मिळाली. थोडी फळं होती, तेवढ्यावर निभावेल असं वाटलं. शेकोटी करण्यासाठी लाकूडफाटा जमा करून ठेवला. तेवढ्यात एक सांबरे नावाच्या आजी मदतीला आल्या. त्यांनी डाळभात आणून देते असे सांगितल्यावर जीवात जीव आला. आता सूर्य मावळून अंधाराचं साम्राज्य पसरायला सुरूवात झाली होती. बराच प्रयत्न केल्यावर शेकोटी पेटली एकदाची. कृष्ण अष्टमी असल्याने चंद्रोदय रात्री एकच्या सुमारास होणार होता. शहरात आपल्याला दिव्यांची इतकी सवय झालेली असते की अशा ठिकाणी अंधाराचं अस्तित्व अधिक प्रकर्षाने जाणवतं. थोड्याच वेळात आजीबाई डाळभात, दोन ब्लॅंकेट आणि एक टॉर्च घेऊन आल्या. भुकेल्या पोटी ही वन डीश मील अमाप तृप्ति देऊन गेली.
          आता मात्र नऊ वाजून गेल्याने सर्वत्र अंधार गुडुप झालं होतं. अशा काळोखात अंधारालाही वाचा फुटते. लांबून अस्पष्ट असे गायींचे हंबरणे किंवा कुत्र्यांचा भुत्कार एकीकडे आधारही देत होता तर एखादं जनावर तर येणार नाही ना अशी अनामिक भीती पण घालत होता.  आता निवांतपणे झोपण्याचा विचार केला. टाॅर्चच्या प्रकाशाचाच एक आधार होता. मंदिरात नाकतोडे, मुंगळे, पाली व इतर अनेक किडे संचार करत होते. आम्ही त्यांच्या राज्यात घुसखोरी केली होती ना. मला अशावेळी कधीच नीट झोप लागत नाही. एक दोन डुलक्या सोडल्या तर बहुतांश रात्र मी जागूनच काढली.
          सकाळी आजीबाई चहा घेऊन आल्या. त्यांना पैसे देऊ केले तर घेईनात. नातवंडांच्या शिक्षणासाठी ठेवा म्हटल्यावर त्यांनी घेतले. सर्व सामान आवरून आम्ही उतरायला सुरुवात केली. दोन टेकड्यांमधे छान धुक्याची दुलई पसरली होती. त्यातून चालण्याचा अनुभव अगदी अवर्णनीय होता. गवताच्या पात्यांवर दवबिंदूंची पखरण होती. त्यातून चालताना तो ओला स्पर्श सुखावून जात होता. चटाचट उतरत जिते गावात आलो. आमची स्विफ्ट कार वाटच पाहत होती. अशा तर्‍हेने एका संस्मरणीय ट्रेकची सांगता झाली. 

Thursday 26 January 2017

बिष्टा, कऱ्हा, दुंधा व अजमेरा ट्रेक (Bishta, Karha, Dundha and Ajmera)

माझा मित्र, स्वप्नीलचा मेसेज आला की ट्रेक क्षितिज संस्थेचा हा जरा offbeat trek आहे आणि मी लगेच त्याला जायचे निश्चित केले. या आडबाजूला फारसं कोणी जात नाही. बागलाण तालुक्यात हे चार किल्ले आहेत. नावांवरून तर ते किल्ले वाटतच नाहीत.
      १३/०१/१७ च्या रात्री नाशिक
ला पोचून सटाण्याला निघालो.  पहाटे कोटबेलला पोचलो.  गावातून बरोबर पश्चिमेला किल्ला दिसतो. पण पायथा गाठायला आधी शेते आणि नंतर एक छोटी टेकडी ओलांडावी लागते. किल्ल्याचा कातळ जवळ आला की तो उजवीकडे ठेवून चढत राहायचे की आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. वर पाण्याची टाकी वगळता दुसरं काही नाही. येताना मात्र गावापर्यंतची तंगडतोड वैताग आणते.
     आता लक्ष्य होते कर्हा किल्ला. कोळीपाडा गावात आलो.  तिथून किल्ला २५० मीटर उंच दिसत होता. पायथ्याशी आधी जेवून घेतले. एकाच दिशेने दोन टप्प्यांत चढण आहे. मुरमाड घसारा आहे अधूनमधून. वर एक छोटेसे देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीची अठरा हातांची मूर्ती आहे. पाण्याची टाकी आहेत, पण पाणी खराब आहे. जेवण झाल्यामुळे आणि लगेच पटापट चढल्यामुळे दमलो होतो, त्यामुळे तिथे पाठ टेकताच जरा डुलकी लागली. अशावेळी झोप कशी लागते हे एक नवलच आहे. खाली खडबडीत जमीन, वरून ऊन, आजूबाजूला थोडी गडबड-बडबड तरीपण १५  मिनिटे तरी गाढ झोप लागली. अर्ध्या तासात उतरून खाली आलो.
       आता पुढचा स्टाप होता, देवळाणेचे शिवमंदिर. पूर्णपणे दगडात बांधलेले आणि सुस्थितीत असलेले असे हे मंदिर आहे. आश्चर्य म्हणजे देवळाच्या बाहेरील बाजूस मिथुनशिल्पे कोरलेली आहेत. अशा ठिकाणी असे काही पाहायला मिळेल अशी जरा सुद्धा कल्पना नव्हती.
       तिथून जवळच दुंधा तळवडे गावात  आलो.  गावापासून किल्ल्याचा पायथा दोन किलोमीटरवर आहे. पायथ्याला आश्रम आहे. अजून सूर्य मावळला नव्हता म्हणून लगेच किल्ल्यावर जायचं ठरवलं. एका दिवसात तीन किल्ले जरा जास्तच होतात. पण त्याचा फायदा उद्या होणार होता म्हणून जड झालेले पाय पुन्हा चालते करून वर निघालो. याच एकमेव किल्ल्यावर जरा झाडी आहे. कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. वीस मिनिटात वर आलो. वर छोटेसे मंदिर, आश्रम आहे. गोरखचिंचेचे दोन विशाल वृक्ष आहेत जे मी पहिल्यांदाच पाहिले. याची फळे औषधात वापरतात. उजव्या बाजूने गेल्यावर थोडे खालच्या बाजूला कातळात देव टाके आहे, यातले पाणी पिण्यासाठी चांगले आहे. डाव्या बाजूला अजून एक टाके आहे पण पाणी चांगले नाही. अंधार पडायला लागला तसं आम्ही उतरायला सुरुवात केली. खाली येईपर्यंत चांगलाच अंधार झाला. आजूबाजूच्या गावातले दिवे उजळले होते. पायथ्याच्या मंदिराच्या समोर एक सभागृह आहे. तिथे सर्वांनी सॅक टाकून जागा पटकावल्या. खूप थंडी असेल असे वाटत होते पण मंदिराच्या तीन बाजूने डोंगर आणि झाडे असल्याने थंड वारे म्हणावे तेवढे वाहत नव्हते.
     आधी चहा, मग सूप आणि शेवटी भात-खिचडी असे भरपेट जेवण झाले. मला तशी मुक्कामी ट्रेकला झोप नीट लागत नाही पण स्लीपिंग  बॅगमध्ये झोपही बरी लागली.
     दुसरा दिवस : आज एकच किल्ला करायचा असल्याने निवांत होतो. अजमेर सौंदाणे मार्गे पहाडेश्वर मंदिर येथे आलो. मंदिरामागेच अजमेरा किल्ल्याचा पहाड आहे. खालून सर्वोच्च माथा दिसत नाही. अर्ध्या तासात माचीसारख्या टप्प्यावर पोचलो. इथून किल्ला डावीकडे ठेवून वळसा मारून माथ्यावर पोचलो. भन्नाट वार्‍याने स्वागत केले. छान मस्त मोकळी शुद्ध हवा. ही हवा शहरात धुराच्या मार्यात हरवून जाते. अश्या हवेसाठी आपण किती आसुसलेले असतो ते इथे आले की कळते. किती वेळ झाला तरी हवा अंगाला बिलगून जातच होती.  गवत वाळलेले होते तरीही त्यावर छान लहरी उठत होत्या. किल्ला खूप लांब पसरलेला आहे. पलीकडच्या टोकाला ध्वजस्तंभ आहे. तर मध्यभागी शंकराची  पिंड आणि नंदी. टाके पण आहे पण पाणी खराब.
    अशा स्वच्छंद वातावरणात कोणतेच टेन्शन जाणवत नाही. घड्याळात किती वाजलेत ते पण बघावसं वाटत नाही. खूप दूरपर्यंत शेती आणि शेततळी यांचेच दृश्य दिसत होते. खाली उतरताना पुन्हा ट्रेक क्षितिज बरोबर ट्रेकला जायचे हे ठरवूनच टाकले.
Bishta fort from kotbel


Bishta fort - close look

Bishta fort - climbing
Temple at Devlane village
Information at the base of Dundha
Gorakhchinch at Dundha

Mithunshilpa
Ajmera fort from Pahadeshwar temple
Top of Ajmera
Water cistern at Ajmera

Carved decorative pillar
Temple at the base of Dundha - place for night stay

Karha from base

Temple at the top of karha

Devi temple at the base of Karha